प्रतिनिधी
सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतरमहाविद्यालयीन मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा दि. 27/10/2023 रोजी पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हयातील एकूण 44 महाविद्यालयातील 148 कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये श्री छत्रपति महाविद्यालय भवानीनगर व अमृतेश्वर महाविद्यालय विंझर या दोन्ही महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद विभागून मिळविले व अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर यांनी उपविजेतेपद मिळविले. ग्रीकोरोमन क्रीडाप्रकारामध्ये टी.सी महाविद्यालय बारामती यांनी प्रथम क्रमांक मिळविला व आर. जे. एस. पी. एम. महाविद्यालय भोसरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धा दोन मॅटवर खेळविल्या गेल्या राष्ट्रीय कुस्तीपंच रवी बोत्रे आणि त्यांच्या सर्व पंच सहकारी पंचानी कुठल्या हि प्रकारचा वाद न होता स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. ऋषीकेश धुमाळ व श्री. संकेत जगताप यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना महाविद्यालयातर्फे उपस्थित खेळाडू, पंच यांना सर्व सुविधा पुरविल्या जातील अशी ग्वाही देऊन पुणे जिल्ह्याचा दर्जेदार संघ विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी निवडावा व विद्यापीठ स्तरावर जिल्ह्याचा संघ विजेता व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या,अशा प्रकारच्या स्पर्धेतून ऑलिंपीक कुस्तीतील पदकांचा दुष्काळ संपवावा असे सांगून खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे, पंचांचे निर्णय मान्य करावेत असे सांगितले. याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे तसेच वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे देशमुख व महाविद्यालय नियोजन विकास समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत काकडे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप व त्यांचे सर्व सहकारी यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.