प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने कोंढवा भागातून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. फरार झालेला तस्कर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला आला असताना पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मेफेड्रोन तस्करीचा प्रकार उघडकीस आणला. विश्रांतवाडी, कुरकुंभ ओैद्योगिक वसाहत, दिल्ली, तसेच सांगली शहरात छापे टाकून पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया, अशोक मंडल, वीरेंद्रसिंग बसोया फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शोएब शेख पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.
शेख आईला भेटण्यासाठी कोंढवा भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जळगाव, पंढरपूर, शिर्डीला पसार झाला होता. मेफेड्रोन विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या हैदर शेखच्या माध्यमातून तो मेफेड्रोनचा पुरवठा, गोदामात साठवणूक करत होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आणि पथकाने ही कारवाई केली.