प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

क्राईम

प्रतिनिधी

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर पती वारंवार चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून पत्नीला मारहाण केल्यानंतर तिला विष पाजून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना काटोलमध्ये घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. आरोपी जितेंद्र सिद्धार्थ तायडे (३१, नरखेड) हा ऑटोचालक असून त्याचे गावातील युवती प्रगती (२७) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, परंतु कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यामुळे दोघेही गाव सोडून काटोलला राहायला आले. जितेंद्र हा शहरात ऑटो चालवित होता. प्रगती एकटी घरी राहत होती. त्यामुळे ती फोनवर सतत नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीशी बोलत राहायची. त्यामुळे जितेंद्रला तिच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे त्याने तिला फोनवर बोलण्यावरून अनेकदा टोकले. त्याने तिचा मोबाईल फोन स्वत:कडे ठेवून घेतला.

दरम्याने, तिला आलेले सर्व फोन तो उचलून बोलत होता. त्यामध्ये काही मित्रांचे फोनसुद्धा येत होते. त्यामुळे त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय वाढला. ‘तुझे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध आहेत’ असे बोलून मारहाण करीत होता. बुधवारी रात्री तो घरी आला आणि त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर एका ग्लासमध्ये पाण्यात विष टाकून पत्नीला बळजबरीने पिण्यास भाग पाडले. शेजाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी प्रगतीला रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे यांनी पती जितेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.