*जिल्ह्यातील शस्त्रपरवानाधारकांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे दि. १२: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७४ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) नुसार छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लोकसभा निवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ३१८ शस्त्रपरवानाधारकांना त्यांच्याकडील ३ हजार ३५९ शस्त्रे सबंधित पोलीस ठाण्यांना जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश ६ जूनपर्यंत लागू राहतील. संबंधित पोलीस विभागाने शस्त्र परवानाधारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करण्याबाबतचा आदेश बजावावेत. शस्त्र परवानाधारकांनी अशाप्रकारचे आदेश प्राप्त होताच कोणत्याही परिस्थितीत सात दिवसाच्या आत त्यांच्याकडील शस्त्र जमा करावीत. पोलीस विभागाने शस्त्रे जमा करून घेण्याची व्यवस्था करावी. जमा केलेल्या शस्त्रांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच ज्या स्थितीत शस्त्रे जमा केली होती त्याच स्थितीत धारकास परत करण्याची दक्षता घ्यावी. ६ जून नंतर ७ दिवसाच्या आत संबंधितांना त्यांची शस्त्रे परत करावीत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.