प्रतिनिधी
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. बालकाचे अपहरण केल्यानंतर त्याची तीन लाख रुपयांमध्ये दक्षिण सोलापूरमधील एकास विक्री करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. या टाेळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर मालकाप्पा नड्डगंड्डी (वय २४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि साथीदारांनी अपहरण केलेल्या बालकाची तीन लाख रुपयांमध्ये सुभाष कांबळे याला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कांबळे याच्या ताब्यातून बालक ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री घडली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे. आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा सात महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली, तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात अपहरण करणारी एक व्यक्ती अस्पष्टपणे दिसून आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृहापासून आरोपी मोटारीतून पसार झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी ५० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक तपासात आरोपी कर्नाटकातील विजापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी विजापूर येथे सापळा लावून चंद्रशेखर नड्डगंड्डी याला ताब्यात घेतले. नड्डगंड्डी याला पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. चार साथीदारांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले. बालकाची विक्री तीन लाख रुपयांमध्ये सुभाष कांबळेला केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी विजापूर येथील एका हाॅटेलमधून कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.