प्रतिनिधी
शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. दरोडेखोरांकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय २८, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय २१, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अविनश काळे याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. २४ एप्रिल रोजी शिक्रापूर परिसरातील जातेगाव बुद्रुक परिसरात मध्यरात्री काळे, भोसले आणि अल्पवयीन साथीदारांना एका घरात दरोडा टाकला होता. आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६) यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला हाेता. यी घटनेनंतर जातेगाव परिसरात घबराट उडाली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रत्नदीप गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, अमित सिदपाटील यांनी तपास सुरू केला. आरोपी काळे, भोसले आणि साथीदाराने दरोडा टाकल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.