प्रतिनिधी
शहरात दोन खून झाल्याची घटना ताजी असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपताच वारजे भागातील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वारजे भागाचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होता. मतदान पार पडल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट उडाली.
वारजे परिसराचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होता. मतदान शांततेत पार पडल्यानंतर वारजे भागातील रामनगर परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. रामनगर भागातील शक्ती चौकात रात्री पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी हवेत गोळीबार केला असून, गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. गोळीबार करणारे आरोपी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन कात्रजकडे पसार झाले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी सांगितले.