युवकाने आईच्या मदतीने केला भावाचा खून, परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न

क्राईम

प्रतिनिधी

घरात अन्य भावंडांप्रमाणे समान वागणूक मिळत नसल्यामुळे चिडलेल्या मुलाने आई व मोठ्या भावाशी वाद घातला. या वादातून मोठ्या भावाने आईच्या मदतीने लहान भावाचा गळा आवळून खून केला. प्रयाग ऊर्फ बंटी गौर (३४) रा. कुशीनगर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई मीरा गौर (६०) आणि मुलगा प्रभात गौर (३६) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयाने मायलेकाला कारागृहात पाठविले.

श्रीराम गौर हे पत्नी मीरा आणि तीन मुलांसह कुशीनगरात राहतात. आरोपी प्रभात हा इलेक्ट्रिक बिल वाटपाचे काम करतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. वडील श्रीराम गौर हे ई-रिक्षा चालवितात. फिर्यादी सुशांत गौर (३२) हा शिक्षण घेत आहे. बंटी हा शिक्षण घेत होता. त्यामुळे घरात त्याला पाहिजे तसा सन्मान मिळत नव्हता. घरातील निर्णय प्रक्रियेत त्याला सहभागी करून घेतले जात नव्हते. प्रभात काम करतो म्हणून त्याच्या शब्दाला किंमत आहे, त्याचेच ऐकले जाते, असा बंटीचा गैरसमज होता.

२८ जूनला रात्री घरात आई-वडील आणि तिनही भाऊ उपस्थित होते. क्षुल्लक कारणावरून बंटीने वाद घातला. घरात शिवीगाळ केली आणि हेल्मेट फेकले. त्यामुळे घरातील काचेचे सामान फुटले. यावरून दोन्ही भावांत वाद झाला. दोघे एकमेकांना मारहाण करीत होते. बंटी ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. हा प्रकार पाहून आईने त्याचे पाय पकडले, तर त्याचा भाऊ प्रभातने त्याचा गळा आवळला. काही वेळातच तो बेशुद्ध झाला. बेशुद्धावस्थेत कुटुंबीयांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पुढील कारवाईसाठी पोलिसांना माहिती द्या, असे सांगताच घाबरून कुटुंबीयांनी ऑटोरिक्षा मृतदेह घरी आणला.

मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. नातेवाईकांना निधनाची वार्ता देण्यात आली. काही तासांनंतर अंत्यसंस्कार होणार तोच एका शेजाऱ्याने या घटनेची माहिती जरीपटका पोलिसांना दिली. पोलीस त्यांच्या घरी धडकले. विचारपूस करून मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी केली असता कुटुंबीयांनी विरोध दर्शविला. बराच वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची नोंद करून आई आणि मुलास अटक करण्यात आली.