प्रतिनिधी
आम्हाला ओवाळणी नको?लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको? परंतु आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा व आमचा सातबारा कोरा करा?”–
“१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांनीत्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शेत जमिनीवरील शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला तिसरा दिवस झाला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्या महिलांनी खेड तालुक्यात पदार्पण करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “जनसन्मान रॅलीत” त्यांची भेट वाकी येथील राजरत्न हॉटेलमधील नियोजित कार्यक्रमात घेतली. त्या ठिकाणी महिलांनी अजित पवार यांना राखी बांधून आम्हा महिला भगिनींना ओवाळणी नको, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नको परंतु आमच्या शेतजमिनीवर ४0 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेले बेकायदेशीर पुनर्वसनाचे शिक्के काढून आमचा सातबारा कोरा करा. असा प्रश्न करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे साकडे घातले.
काळुस येथे सुरू असलेल्या स्वातंत्र्यदिनापासूनच्या बेमुदत आमरण उपोषणाची पार्श्वभूमी महिलांनी अजित पवारांच्या समोर मांडली व त्यांना निवेदन दिले . यावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितले अडचण काय आहे ? प्रश्न का सुटत नाही?अडचण असेल तर मला सांगा आणि हा प्रश्न मार्गी लावा असे आश्वासित केले.
जोपर्यंत पुनर्वसनाचे शिक्के काढले जात नाही व सातबारा कोरा केला जात नाही . तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार काळूस येथील उपोषणकर्ते शेतकरी, महिला यांनी केला आहे. शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार देखील येथील आंदोलकांनी केला आहे.
काळुस गावातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या मते आम्हाला चासकमान धरणाचे पाणी मिळणार यासाठी पुनर्वसन टाकण्यात आले होते परंतु अद्याप पाणी मिळाले नाही त्यामुळे आम्ही लाभ क्षेत्रात येत नाही आणि लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे आमच्या जमिनीवरील शिक्के काढले गेले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे. पाणी नाही तर जमीन नाही अशी त्यांची भूमिका आहे.
उपोषण स्थळी महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी जमीन आमच्या हक्काची! नाही कुणाच्या बापाची!’कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही!’पाणी नाही तर जमीन नाही, शेतकरी महिला आघाडीचा विजय असो! कोरा करा कोरा करा सातबारा आमचा कोरा करा! शेतकरी एकजुटीचा विजय असो! अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. महिला भगिनींमध्ये सुवर्णा पठारे, सारिका पवळे, सुलाबाई पवळे, सुशीला पवळे, सावित्रा पवळे, बायडाबाई पवळे, वर्षा पवळे, अश्विनी पवळे, तृप्ती आरगडे, पूजा आरगडे, सावित्रीबाई आरगडे यांनी शिष्टमंडळात भाग घेतला.