प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर :- मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे नुकतीच महाविद्यालयीन स्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला,वाणिज्य,विज्ञान व संगणक शास्त्र या शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा उपकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता व शेती विकास, टाकाऊ प्लास्टिक पासून वीट व वीज निर्मिती, आरोग्य तपासणी यंत्र, शेतीसाठी पाणी बचत उपकरण, बँका व सामाजिक विकास, भाषाकुल संकल्पना इत्यादी विषयांवर प्रकल्प व प्रतिकृती यांचे सादरीकरण केले. सदरच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ.संजय देवकर यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होईल असे मत प्रकट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी मानवी उत्क्रांती पासून ते आज अखेर संशोधनामध्ये झालेले बदल व संशोधनाचे वाढलेले महत्त्व याविषयी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. सतीश लकडे, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. जवाहर चौधरी, प्रा. अच्युत शिंदे, डॉ बाळासाहेब मरगजे, डॉ. निलेश आढाव, डॉ. दत्तात्रय डुबल, डॉ. नारायण राजुरवार, प्रा.सचिन इतापे,प्रा. नामदेव जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.श्रीकांत घाडगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रवीण ताटे-देशमुख यांनी आभार मानले.