प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी सतीश मोहिते (रा. निरगुडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही ती शाळेत ये-जा करीत असताना रस्त्यात अडवून तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(m), ६५(१), ७८, ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाई करून संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा आणि तिच्यावरील अत्याचाराचा हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
