प्रतिनिधी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जामठ्याच्या मैदानाजवळ चक्क वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मृत्यू तब्बल १५ दिवसांपूर्वीचा असून वाघाच्या कवटीला मार आहे. तर वाघाची दोन नखेही गायब आहेत. तरीही वनखात्याने घटनेचा पीओआर फाडला नाही. केवळ अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. चौकशीचा ससेमिरा टाळण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.
नागपूरपासून अवघ्या १८ किलोमीटरवर जामठा क्रिकेट स्टेडियम आहे. याच जामठालगत रुई हे गाव आहे. भवताली मोठ्या इमारती आणि घरे असलेल्या या परिसरात अर्धवट कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला. त्यावरून साधारण १५ दिवसांपूर्वी हा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. नागपूर वन विभागातील सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील रुई गावाचा भाग आहे. वर्धा महामार्गाला लागून असलेल्या इडन पार्क वसाहतीतील कर्मचाऱ्यांना वाघाचा मृतदेह आढळून आला.
या वसाहतीपासून सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर असलेल्या या मृतदेहाबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वनखात्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वाघाच्या शरीराचे अवयव शाबूत असले तरी कवटीला मार असल्याने वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा आणि कुणीतरी तो मृत वाघ बाजूला आणून टाकला असावा, अशीही शक्यता आहे. वनखात्याने मात्र हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दाट शक्यता असतानाही वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमने यांनी आजूबाजूला साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. किंवा घटनेचा पीओआर फाडण्याचीही तसदी घेतली नाही. चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून ही प्रक्रिया सोयीस्कररित्या टाळण्यात आली. यासंदर्भात सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमने यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यप्रणालीनुसार ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी पंकज थोरात व पशुवैद्यकीय अधिकारी राजेश फुलसुंगे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे तसेच वनरक्षक हरीश किनकर यांनी पार पाडली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून अनिल दशहरे व प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर उपस्थित होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली. जखमी झाल्याने किंवा आजारपणामुळे मृत्यू झाला असावा. वाघाच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी हा वाघ बसला होता. त्याच ठिकाणी सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा. त्याची शिकार झाली असावी, असे प्रथमदर्शनी वाटत नाही. मात्र, तरीही आम्ही हाडे आणि उरलेले अवशेष पुढील तपासणीसाठी पाठविले आहे’, अशी माहिती नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांनी दिली.