चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण, दारुड्या युवकाने…

क्राईम

प्रतिनिधी

यशोधरानगर परिसरात राहणारी १० वर्षीय मुलगी आठवडी बाजारात गेली होती. तेथे ओळखीच्या एका आरोपी युवकाने तिचे दुचाकीवर अपहरण केले. तिला दिवसभर शहरात फिरवले आणि शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना सक्करदरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. बुधवाार दुपारपासून सुरु असलेल्या अपहरण नाट्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र, शेवटी पोलिसांच्या सापळ्याला यश आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

यशोधरानगरात राहणाऱ्या मजूर दाम्पत्याची १० वर्षीय मुलगी कळमन्यातील गुलमोहर नगरात भरणाऱ्या आठवडी बाजारात गेली होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास वस्तीत राहणाऱ्या दारुड्या युवकाने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. त्याने मुलीला दुचाकीवर बसवले आणि तेथून अपहरण केले. त्याने काही तासापर्यंत शहरात फिरला. दरम्यान, मुलीचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी लगेच पोलिसांचा सापळा रचला. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. नियंत्रण कक्षाने लोकेशनवरून युवक भांडे प्लॉट चौकातून शहराबाहेर जात असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या आरोपी युवकाला भांडे चौकातून अटक केली. तर त्याच्या ताब्यातून मुलीची सुखरुप सुटका केली. आरोपीला रात्री उशिरा कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.