भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त

क्राईम

प्रतिनिधी

भिवंडीतील तळवळी भागात वाहनांना अडवून दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या तिघांना निजामपूरा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुल, एअरगन, मिरचीपुड, फायटर, चाकू, दोरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्याकाही दिवसांपासून भिवंडीत महामार्ग आणि मार्गांवर वाहन चालकांना लुटणाऱ्या ‘हायवे राॅबर’च्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरोडेखोऱ्यांनी यापूर्वी किती जणांना लुटले आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे विविध राज्यातील अवजड, जड वाहने रात्रीच्या वेळात शहरात प्रवेश करत असतात. मुंबई नाशिक महामार्ग किंवा मुख्य रस्त्यांवर जड, अवजड वाहन चालकांना आणि शेतकऱ्यांना लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी भिवंडी येथील कांबा तळवळी नाका या मार्गावर काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती निजामपूरा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने या भागात सापळा रचला. त्यावेळी पाच दरोडखोर येथे घात लावून बसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांच्या पथकाने दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. यातील दोन दरोडेखोर पळून गेले. तर उर्वरित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. वाहन चालकांवर दरोडा टाकणार होतो अशी कबूली त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.