स्थिर निरीक्षण पथकांनी निवडणूक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करावी- तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचना*

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती, दि.१२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्याअनुषंगाने बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता स्थिर निरीक्षण पथक स्थापन करण्यात आले असून पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवावे आणि असे प्रकार आढळल्यास कारवाई करावी, अशा सूचना अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिल्या.

बारामती तहसील कार्यालय येथे स्थिर निरीक्षण पथकासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, तुषार गुंजवटे, निरीक्षण पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कामकाज आणि जबाबदाऱ्यांविषयी माहिती देऊन श्री. शिंदे म्हणाले, मतदारसंघात प्रमुख जिल्हा व राज्य महामार्गावर तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावरील रोख पैसा, बेकायदेशीर दारू,अंमली पदार्थ, संशयास्पद वस्तू किंवा दहा हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीची निवडणूक सामग्री, निषिद्ध वस्तू आढळल्यास ती जप्त करून कारवाई करावी. वाहन तपासणी प्रक्रियेचे चित्रीकरण करावे. वाहनांच्या नोंदीच्या अनुषंगाने नोंदवहीबाबत दैनिक अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.