प्रतिनिधी
मांजरी रेल्वे स्थानक परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दीड महिन्याच्या तपासानंतर आरोपीला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला.
खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव (वय ३०, रा. खामगाव फाटा, उरळी कांचन, सोलापूर रस्ता, मूळ रा. लातूर) याला अटक केली. विक्रम एका रोपवाटिकेत काम करतो. ६ एप्रिल रोजी मांजरी रेल्वे स्थानक परिसरातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
महिलेची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी हडपसर, मांजरी भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा सिरम इन्स्टिट्यूट परिसरातून आरोपी विक्रम जाधव एका महिलेला रिक्षातून घेऊन गेल्याचे चित्रीकरणात आढळून आले. पोलिसांनी शंभरहून जास्त ठिकाणचे चित्रीकरण तपासले. जाधव महिलेला ज्या रिक्षातून घेऊन गेला होता. त्या रिक्षाच्या पाठीमागील बाजूस एका शाळेची जाहिरात लावली होती. त्यानंतर पोलिसांनी जवळपास ३०० हून जास्त रिक्षाचालकांची चौकशी केली. तपासात महिलेचा खून करून पसार झालेला आरोपी जाधव यवत परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना दिली. खामगाव फाटा परिसरातून जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेच्या खूनाची कबुली दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गित्ते, मंगल मोढवे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अमोल दणके, चंद्रकांत रेजितवाड यांनी ही कामगिरी केली.
आरोपी विक्रम जाधव एका रोपवाटिकेत काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी मूळगावी लातूरला गेली होती. हडपसर परिसरात तो ६ एप्रिल रोजी आला होता. त्यावेळी त्याला एक फिरस्ती महिला दिसली. तिने तहान आणि भूक लागल्याचे सांगितले. तिच्या पायात चप्पल नव्हती. तिने जाधवकडे चप्पला मागितली. तेव्हा माझे घर जवळ आहे, असे महिलेला सांगितले. तिला रिक्षातून मांजरी रेल्वे स्थानक परिसरात नेले. महिलेवर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केला. तेव्हा त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो लातूरला पसार झाला. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर तो पुन्हा यवतला आला.
कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी महिलेच्या खूनाचा उलगडा केला. अत्याचारास विरोध केल्याने आरोपीने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. दीड महिने तपास करून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.