प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…

क्राईम

प्रतिनिधी

एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. प्रतीक त्रिलोक व्यवहारे (३५) रा. दिघोरी, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

डिसेंबर २०२० मध्ये तरुणीचे नातेवाईक नंदनवन परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्याचवेळी प्रतिकचे नातेवाईकही त्याच रुग्णालयात दाखल होते. या दरम्यान दोघांची ओळख झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून तो तिचे लैंगिक शोषण करू लागला. या दरम्यान प्रतिकची वागणूक योग्य नसल्याने तरुणीने त्याच्यापासून दुरावा करीत बोलणे बंद केले. प्रतिकने तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन संबंध कायम ठेवण्यासाठी दबाव टाकला.

काही दिवसांपूर्वी तरुणीने लग्नाबाबत विचारले असता प्रतिकने नकार दिला. त्यामुळे तरुणीने नातेवाईक असलेल्या युवकासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी घरी तयारीही सुरु होती. मात्र, प्रतिकने तिला लग्न केल्यास बदनामी करून लग्न मोडण्याची धमकी दिली. प्रियकर लग्न करीत नाही आणि अन्य युवकासोबत लग्न करण्यास मनाई करीत असल्यामुळे तरुणी संभ्रमात पडली. यामुळे तरुणीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली.

उपराजधानीत गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या नागपुरात गेल्या चार महिन्यात ७२ तरुणी, महिलांवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींमध्ये प्रियकर, मित्र, नातेवाईक, शेजारी आणि वर्गमित्र अशा ओळखीच्या आरोपींचा समावेश आहे. लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे उपराजधानीतील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.