मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम

प्रतिनिधी

मुंबईतील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दहिसर येथील रहिवाशाची तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार दहिसर (पूर्व) येथील आनंद नगरमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्यावर्षी त्यांचा मुलगा वैद्यकीय प्रवेश परीक्षा उतीर्ण झाला होता. त्याला मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. गेल्या वर्षी सौरभ कुलकर्णी याने आपल्या मुलाला वैद्यकीय प्रवेश मिळवून दिला होता, असे एका परिचित महिलेने तक्रारदारांना सांगितले. तक्रारदाराने या महिलेच्या माध्यमातून सौरभ कुलकर्णीशी संपर्क साधला.

कुलकर्णी व त्याचा साथीदार अमन पाऊणीकर यांनी प्रवेशासाठी पैसे घेताना तक्रारदाराला प्रतिज्ञापत्रही बनवून दिले होते. त्यात व्यवसायासाठी पैसे घेत असल्याचे नमुद करण्यात आले होते. तसेच तक्रारदारांना दिलेला धनादेशही वठला नाही. तक्रारदारांनी आरोपींना सहा लाख रुपये दिले होते. त्यातील दोन लाख २० हजार त्यांना परत करण्यात आले. उर्वरित रक्कम अद्याप परत करण्यात न आल्यामुळे त्यांनी याप्रकरणी दहिसर पोलिसांकडे तक्रार केली.