पोलीस शिपाईच फसला सात लाखांना! प्रकरण काय?

क्राईम

प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी पुणे शहर पोलीस दलातील एका पोलीस शिपायाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पोलीस शिपाई शिवाजीनगर पोलीस वसाहतीत राहायला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलीस शिपायाने समाजमाध्यमात एक जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष जाहिरातीत दाखविण्यात आले होते. जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर पोलीस शिपायाने संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले.

चोरट्यांनी त्यांना एक ॲपबाबत माहिती दिली. माेबाइलमध्ये संबंधित ॲप समाविष्ट केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत त्यांनी चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी सात लाख ४५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी ॲपच्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे भासविले. ॲपद्वारे परताव्यापोटी जमा झालेली रक्कम त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रक्कम मिळाली नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत