प्रतिनिधी
जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांनी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ अंतर्गत आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षाविषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त अभय गिते यांनी केले आहे.
बांधकाम आस्थापना मालकांनी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यादृष्टीने कामगारांना सुरक्षाविषयक सर्व साहित्य, साधने उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या राहण्याची सोय सुरक्षित ठिकाणी करुन त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. बांधकाम व्यवसायिकांनी सुरक्षा परिक्षण (सेफ्टी ऑडीट) पूर्ण करुन घ्यावे. त्याकरीता सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्याला सतर्क राहाण्याच्या सूचना द्याव्यात.
बांधकाम आस्थापना मालकांनी नोंदीत बांधकाम कामगारांनाच कामावर नेमावे. अनोंदीत कामगार असल्यास प्राधान्याने त्यांची नोंदणी करुन त्यांची खातरजमा व्यक्तीशः करावी. ज्यांच्याकडे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार, कर्मचारी मिळून एकूण १० पेक्षा अधिक असतील, अशा नोंदीत न झालेल्या मालक, नियोक्तानी https://lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच आपल्या आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या https://mahabocw.in या संकेतस्थळावर करावी.
मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्या सर्व योजनांचे लाभ बांधकाम कामगारांना मिळण्याच्यादृष्टीने त्यांना सहकार्य करावे. अधिक माहितीकरीता कामगार उप आयुक्त कार्यालय, शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, २ रा व ३ रा मजला, संगमवाडी, पुणे-३ येथे संपर्क साधावा,असे आवाहनही श्री.गिते यांनी केले आहे.