समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कार्यशाळा संपन्न

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे व सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांची कार्यशाळा मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे आयोजित करण्यात आली.

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त तथा इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक विशाल लोंढे, माडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, डॉ. अशोक चांडक, नवरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनिषा डाळे, समाज कल्याण निरीक्षक महेश गवारी, इतर मागास बहुजन कल्याण निरीक्षक अर्चना होले, नाझिम नायकवडी तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिष्यवृत्ती संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत भारत सरकार शिष्यवृत्ती (महाडीबीटी), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व वसतिगृह योजनेकरीता सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज भरण्याबाबत श्री. लोंढे यांनी मार्गदर्शन केले.

या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत. योजनेच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन महाविद्यालयांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.