तहसीलदार गणेश शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती, दि. ३०: तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसील कार्यालयात कविवर्य मोरोपंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून महसूल प्रशासनाविषयी माहिती दिली.

यावेळी अपर तहसीलदार महेश हरिशचंद्रे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. शिंदे यांनी महसूल यंत्रणेचे स्वरुप, कार्यपद्धतीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महसूल यंत्रणा गावपातळीपासून ते मंत्रालयस्तरापर्यंत काम करीत असते. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थिती, निवडणूक यासारखी विविध महत्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. प्रशासनातील सर्व विभागाशी संबंध येत असल्याने महसूल विभाग हा शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाकडून नागरिकांना जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा, शिधापत्रिका असे विविध संगणकीकृत पद्धतीने दाखले उपलब्ध करुन देण्यात येतात, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना अशा विविध योजनांचा लाभही नागरिकांना देण्यात येतो, असेही श्री. शिंदे म्हणाले.

जीवनात यशस्वी होण्याकरीता आपल्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी ठेवावी, नेहमी उपक्रमशील रहावे, सतत वाचन सुरु ठेवावे. आपण किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. आपल्या मान, सन्मानासाठी तसेच स्वतःमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण घेत रहावे. आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वत:सोबत देशाच्या विकासाकरीता होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असा संदेशही श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी विद्यार्थ्यांनी महसूल यंत्रणेविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन श्री. शिंदे यांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी कार्यालयातील शाखानिहाय भेट देवून कामकाजाबाबत जाणून माहिती घेतली.