पुणे, दि.८: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार असून याबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( एनयूएम, एमएसआरएलएम व माविम), मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, अशी माहिती श्रीमती रंधवे यांनी दिली.