शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Uncategorized

प्रतिनिधी.

: विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीतील २१०, बारामती तालुका १४९, माळेगाव १४७, वडगांव निंबाळकर १४७, सुपा २९, वालचंदनगर २३५, इंदापूर २४४, भिगवण ७४, दौंड १३०, यवत हद्दीतील २८८, उरुळी कांचन ११७, शिरुर २७३, रांजणगाव ५०, शिक्रापूर ११९,सासवड ११४, जेजुरी ९२, भोर ११२, राजगड १०६, हवेली ६७, वेल्हा हद्दीतील १७९, पौड पोलीस ठाणे हद्दीतील २७८, लोणावळा ग्रामीण ३५, लोणावळा शहर ६७, वडगांव मावळ ३७, कामशेत ४६, खेड ९२, मंचर पोलीस ठाणे हद्दीतील ४८, पारगांव पोलीस ठाणे हद्दीतील ३०, घोडेगाव २९, जुन्नर ४१, नारायणगाव ३९, आळेफाटा ३०, ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील २३ शस्त्र परवान्यांच्या समावेश आहे.

गठीत करणेत आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच गावातील विशिष्ट समाजातील प्रभावशाली व्यक्ती, ज्या निवडणुकीचे प्रक्रियेमध्ये ऐनकेनप्रकारे संमिलीत होण्याची शक्यता आहे अशा व्यक्ती राजकीय पक्षाचे प्रचारात अथवा राजकीय सभेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यक्ती प्रचारात अथवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाल्यास ते शस्त्रपरवानाधारक असल्याने या बाबींचा गावात, त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणात अथवा त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पडू शकत असलेने, अशा परवानाधारकांची तसेच मयत परवानाधारकांची शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश शस्त्र परवाना धारकांना पोलीस विभागाने तात्काळ बजवावेत. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता मधील कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील.