प्रतिनिधी
आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला. चालू वर्षी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. निलेश आढाव यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानाचे प्रभावी पालन करण्याबाबत शपथ ग्रहण केली.
या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी संविधान दिन साजरा करण्याचे महत्व त्याचबरोबर संविधान निर्मितीची प्रक्रिया, त्याची अंमलबजावणी व आजच्या काळामध्ये त्याची उपयुक्तता या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश आढाव यांनी केले तर राज्यशास्त्र विभागाचे डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार प्रदर्शन केले.