सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*

Uncategorized

प्रतिनिधी.

जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक भूषण लघाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा आराखडा मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला आहे. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे.

पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाचे उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असताना सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप करून जिल्ह्यातील विविध बँकांनी ११६ टक्के लक्ष गाठले आहे. वार्षिक पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) उद्दिष्टाच्या अनुषंगाने बँकांनी आजपर्यंत ५ हजार ७४५ कोटी रुपये कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सर्वांचे अभिनंदन ही केले.

राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेऊन नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

श्री. लघाटे म्हणाले, सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

श्री. मोहानवी आणि योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.