सह संपादक- अक्षय थोरात
आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव समोर आले आहे. रस्त्यावर सोडून दिलेली, दूध न पिऊ शकणारी आणि स्वतःचा चारा शोधण्यास असमर्थ असलेली निरागस वासरं पाहिली की प्रश्न पडतो— यांचा जन्म काय फक्त लाचारीसाठीच झाला आहे का?
ज्या गाईने दूध दिले, तिचे गोऱ्हे किंवा कालवडी आज शेतकऱ्यांसाठी ओझे का ठरत आहेत? अनेक शेतकरी या निष्पाप वासरांना रस्त्यावर, उकिरड्यावर किंवा निर्जन ठिकाणी सोडून देत आहेत. ज्यांना अजून नीट चाराही खाता येत नाही, अशा तान्हुल्या जीवांना मृत्यूच्या दाढेत लोटताना कोणाचेही हात थरथरत नाहीत, हे दुर्दैव आहे.
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना काही झाले तर प्राणिमित्र संघटना, NGO आणि तथाकथित प्राणी प्रेमी लगेच रस्त्यावर उतरतात, उपोषणे करतात, आंदोलने करतात. मग जेव्हा हे ‘गो-पुत्र’ अन्नाविना आणि उपचाराविना तडफडून मरतात, तेव्हा या संघटना कुठे गायब होतात?
NGO आणि संघटनांना फक्त स्वतःचे नाव मोठे करायचे आहे का? फक्त देणग्या आणि निधी जमा करण्यासाठीच ‘गो-सेवा’ नावाचा वापर होतोय का? जर हे वासरू वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नसेल, तर अशा ढोंगी गौ-रक्षकांची समाजाला गरजच काय?
अनेक गौ-शाळांमध्ये फक्त मोठ्या गायींनाच स्थान दिले जाते. जी वासरं लहान आहेत, ज्यांना अधिक देखभालीची गरज आहे, त्यांना तिथे प्रवेश नाकारला जातो. जर या संस्था केवळ फायद्याचा विचार करून चालवल्या जात असतील, तर प्रशासनाने अशा गौ-शाळांची चौकशी करून त्या तत्काळ बंद का करू नयेत? केवळ फोटो काढण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी जर गौ-शाळांचा वापर होत असेल, तर ती मुक्या प्राण्यांची क्रूर थट्टा आहे.
१. रस्त्यावर सोडलेल्या वासरांची जबाबदारी कोणाची?
२. ज्या गौ-शाळा लहान वासरांना नाकारतात, त्यांच्यावर कारवाई कधी होणार?
३. केवळ प्रसिद्धीसाठी राबणाऱ्या संघटनांवर अंकुश कोण ठेवणार?
‘गोमाता’ म्हणणे सोपे आहे, पण तिचे रक्षण करणे कठीण. जर आपण या निष्पाप वासरांना वाचवू शकत नसू, तर आपल्याला स्वतःला सुसंस्कृत समाज म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. प्रशासनाने आणि समाजाने याकडे गांभीर्याने न बघितल्यास, उद्याचा इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.

















