प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास आराखडा राबवण्यात येणार आहे. या विकासकामांना गती देण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत मंगळवारी (दि. २३) आंबेगाव-जुन्नरचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात कामाच्या नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. बैठकीचा सविस्तर अहवाल आता जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम आदेशानंतरच मंदिर बंद करण्याबाबतची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल.
२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळात भीमाशंकरमध्ये लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारने २८८.१७ कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. यामध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट, संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
पुरातत्त्व विभागामार्फत मंदिराचे संवर्धन आणि विकासकामे करताना मोठी यंत्रसामग्री आणि मजुरांची गरज भासणार आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कामात अडथळा येऊ शकतो आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मंदिर काही काळासाठी बंद ठेवण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीला प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे आणि स्थानिक ग्रामस्थ, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांनी संभ्रमात पडू नये:
मंदिर बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असली, तरी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांचा अंतिम आदेश आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अहवाल सादर केल्यानंतर भाविकांच्या सोयीचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
















