बारामती! वडगाव निंबाळकरमध्ये एसटीचा ‘खोळंबा’; विद्यार्थी-प्रवासी तासन्तास प्रतीक्षेत, महामंडळाला मोर्चाचा इशारा.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर बसस्थानकावर शाळकरी विद्यार्थी, कामगार महिला-पुरुष तसेच कामानिमित्त प्रवास करणारे ग्रामस्थ आणि नागरिक एसटी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. वडगाव निंबाळकर परिसरातील छोट्या-मोठ्या खेड्यांमधून विद्यार्थी शाळा व महाविद्यालयासाठी दररोज बसस्थानकावर येतात. नीरा-बारामती मार्गावरील माळेगाव, शारदानगर, सोमेश्वर, वाघळवाडी परिसरात मोठ्या शैक्षणिक संस्था असल्याने या भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र सकाळच्या शाळा-कॉलेजच्या वेळेत पुरेशा बसेस उपलब्ध होत नसल्याची तक्रार पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
आमची मुले शाळा आणि कॉलेजला जाण्यासाठी सकाळी सात वाजता बसस्थानकावर येतात. मात्र दोन-दोन तास एसटी बस मिळत नसेल तर या एसटी महामंडळाच्या सेवेचा उपयोग काय? असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही वेळा बसस्थानकावर विद्यार्थी व प्रवासी बसची वाट पाहत उभे असताना बस उशिराने येते. तर काही बस स्थानकात न थांबता पुढे जात असल्याच्या तक्रारीही प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला वेळेत पोहोचणे कठीण होत असून कामावर जाणाऱ्या महिला-पुरुषांनाही याचा फटका बसत आहे.
काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या आगार प्रशासनातील अधिकारी वडगाव निंबाळकर येथे आले होते. त्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना १५ मिनिटांच्या अंतराने बससेवा उपलब्ध करून देणे आणि जादा बसेस सोडणे व एसटी बस बसस्थानकाच्या आत घेणे अशी आश्वासने देण्यात आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. तसेच बसस्थानक परिसरातील अनधिकृत बॅनर तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र या उपाययोजनांची अंमलबजावणी केवळ एक-दोन दिवसांपुरतीच राहणार का? असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळी आणि दुपारच्या शाळा-कॉलेजच्या वेळेत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या वेळेत नीरा-बारामती मार्गावर अतिरिक्त एसटी बसेस कायमस्वरूपी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ‘१५ मिनिटांनी बस’ अशी व्यवस्था एखाद्या दिवशी करून प्रश्न सुटणार नाही. विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना दररोज वेळेवर बस उपलब्ध होण्यासाठी कायमस्वरूपी वेळापत्रक आणि पुरेशी बससेवा लागू करणे आवश्यक आहे.
वडगाव निंबाळकर बसस्थानकावरील एसटी सेवेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी पुरेशा बसेस उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा एसटी महामंडळाचा कारभार सुधारण्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने एसटी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आता एसटी महामंडळ प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन वडगाव निंबाळकर बसस्थानकासाठी कायमस्वरूपी अतिरिक्त बससेवा, शाळा-कॉलेजच्या वेळेचे स्वतंत्र नियोजन आणि बसस्थानकात बस थांबण्याची प्रभावी व्यवस्था कधी करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
