*बार्टीचे आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू*

Uncategorized

प्रतिनिधी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत सुरू करण्यात आलेल्या आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्धाटन नागपूर येथील सामाजिक न्याय भवनात समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे, प्रकल्प समन्वयक खुशाल ढाक, नागेश वाहुरवाघ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गायकवाड म्हणाले, बार्टीच्या आयबीपीएस प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवण्याची संधी प्राप्त झाली आहे. सहा महिन्याच्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रीत करून अपेक्षित लक्ष्य साध्य करावे. ज्ञानातील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देत असते, असेही त्यांनी सांगितले.

श्री. खवले म्हणाले, शिक्षण आपल्याला यशाकडे घेऊन जाणारे माध्यम आहे. विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणारे अशाप्रकारचे हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यासोबत शैक्षणिक सुविधांसाठी आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे, याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात श्री. वाळके यांनी विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्गदर्शक तत्वे समजावून प्रशिक्षणाबद्दलची माहिती दिली.