काकडे महाविद्यालयाची 52 वर्षात वैभवशाली प्रगती- प्राचार्य डॉ. जाधवर*

Uncategorized

सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा 52 वा वर्धापन दिन 20 जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभासदस्य प्रसेनजीत फडणवीस, महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैया काकडे- देशमुख सचिव सतीश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी ते म्हणाले कोणतेही संस्था मोठी व्हायची असेल तर व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षक यांच्या योगदानामुळेच ती मोठी होऊ शकते, आणि आपल्या व्यवस्थापनाने प्राचार्य व शिक्षकांवर टाकलेल्या विश्वासामुळे आज महाविद्यालयाचा विकास झाला आहे . तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगला शिक्षक आला तर तो मुलांचं कल्याण करू शकतो, आणि श्रीमंत शिक्षक हा की ज्याच्या अवतीभवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो व त्यांचे प्रत्येक वाक्य, शब्द ते आपल्या जीवनामध्ये वापरतात अंगीकारतात आणि स्वतःचे जीवन सुखी करतात असा शिक्षक हा श्रीमंत शिक्षक असतो असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षण कशाला म्हणायचे तर जे माणूस घडवितो त्याला शिक्षण म्हणायचे परंतु आपली शिक्षण पद्धती ही इंग्रजांनी तयार केलेली शिक्षण पद्धती आहे यामध्ये माणूस घडविला जातो का हाही प्रश्न आहे म्हणून आपण अभ्यासक्रमामध्ये जरी नसले तरीसुद्धा आपण माणूस घडवण्याचा काम केले पाहिजे असेही विचार त्यांनी मांडले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शक्ती असते आणि त्यातून तो चमकू शकतो हे किर्लोस्कर व बी.जे. शिर्के यांच्या उदाहरणातून त्यांनी पटवून दिले आणि शेवटी त्यांनी महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आधिसभा सदस्य श्री प्रसेनजीत फडणवीस यांनी महाविद्यालयाने केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी महाविद्यालयाचा परिसर हिरवाईने नटलेला आहे याचेही आवर्जून कौतुक केले आणि महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाने केलेल्या प्रगती विषयी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय मनोगता मध्ये सतीश भैय्या यांनी 52 वर्षांमध्ये महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आलेख कसा वाढत गेला याविषयी आपले विचार मांडले व प्रमुख पाहुणे उपस्थित झाले म्हणून त्यांचे स्वागत व आभार मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी मानले.