प्रतिनिधी.
सोमेश्वर नगर (०२/०७/२४) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, उपप्राचार्या जयश्री सणस यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पालक श्री काकडे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले.
यावेळी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयांमध्ये उपलब्ध शैक्षणिक सुविधा याविषयी मार्गदर्शन केले, त्यामध्ये महाविद्यालयाचे ग्रंथालय हे प्रशस्त असून त्यामध्ये जवळपास ४५ हजार पुस्तके उपलब्ध आहेत व दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच खेळाचे मैदान प्रशस्त आहे त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करावा व आनंद घ्यावा , त्याचप्रमाणे बारावीनंतर कोणकोणत्या संधी आहेत याविषयी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांना एखादा घटक समजला नाही तर तो घटक शिक्षकांकडे जाऊन पुन्हा समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शंका असेल तर थेट प्राचार्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले. व शेवटी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ मध्ये इयत्ता बारावी मध्ये ज्या शिक्षकांनी आपल्या विषयांमध्ये शंभर टक्के निकाल लावला त्या विषय शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
उपप्राचार्या जयश्री सणस यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शिस्त व महाविद्यालयातील उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. तर आभार पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. दत्तराज जगताप यांनी केले.