प्रतिनिधी –
कोऱ्हाळे बुद्रुक येथे कृषीदिनानिमित्त फवारणी दरम्यान आवश्यक खबरदारीचे महत्त्व शारदानगरच्या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.
शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या कृषिकन्या रावे उपक्रमांतर्गत कोऱ्हाळे बुद्रुक येथे आहेत. त्यांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना भेटी देवून हा उपक्रम पार पाडला. यामधे ऐश्वर्या दबडे, साक्षी घुले, मयुखी माहुलकर, अंजली पवार या कृषिकन्यांनी फवारणी करताना संरक्षणात्मक किटचा वापर करावा, यामध्ये हातमोजे, टोपी, गॉगल, जॅकेट, मास्क,पायात बुट असावेत याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले. कारण अनेक शेतकरी अशी कोणतीही खबरदारी न घेता डायरेक्ट फवारणीचा पंप हातात घेतात. असं केल्यामुळे वाऱ्यामुळे कीटकनाशक नाकातोंडात जाऊन विषबाधा होऊ शकते. तसेच शरीरावर जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करु नये. गळके फवारणी पंप वापरु नये. तणनाशके आणि किडनाशके फवारण्याचा पंप वेगवेगळा असावा. फवारणी पंपाच्या नोझल मध्ये अडकलेला कचरा तोंडाने फुंकून साफ करु नये. त्याऐवजी खराब झालेला टुथब्रश किंवा बारीक तार वापरावी हे उपाय सांगितले.
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी,कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवानी कोकरे देसाई, डॉ. मयूर पिसाळ, डॉ. पल्लवी देवकाते, प्रा. अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.