श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२०२६ गळप हंगामाकरिता अनुदानासह प्रति मे.टन ४,०००/- रुपये असा ऐतिहासिक उच्चांकी ऊसदर जाहीर केला असून, संपूर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्षा प्रति मे.टन ५१५/- रुपये जास्त ऊसदर देणारा हा राज्यातील क्रमांक एकचा कारखाना ठरला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या सर्वोच्च ऊसदर देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन ३,८००/- रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास ३,९००/- रुपये तर मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास ४,०००/- रुपये एवढा सर्वोच्च ऊसदर जाहीर केला आहे. मागील गळप हंगामात कारखान्याने एकूण १२,५८,५५५.३७ मे.टन ऊस गाळप केले असून १५,५७,६५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तसेच बी हेवीसह सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखला आहे. को-जन प्रकल्पातून १२,५३,४४,६८० युनिट्स वीजनिर्मिती आणि डिस्टिलरी प्रकल्पातून ८६,२५,००१ लिटर अल्कोहोल व ४३,८२,५६९ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. येत्या गळप हंगाम २०२६-२७ मध्ये फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास १००/- रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास २००/- रुपये तर एप्रिल व त्यानंतर तुटणाऱ्या ऊसास ३००/- रुपये प्रति मे.टन अनुदान देण्याचे ठरवले असून, हार्वेस्टरद्वारे व खोडवा उसासाठीही प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
आगामी हंगामात कारखान्याकडे सुमारे ३९,००० एकर उसाची नोंद आली असून, १२ ते १२.५० लाख मे.टन ऊस गळपास उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. सर्वोच्च ऊसदर देण्याची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपल्या सोमेश्वर कारखान्यासच ऊस घालावा, असे आवाहन चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.
















