बारामती! सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय रणधुमाळीला वेग; ‘पवार विरुद्ध पवार’ लढतीसह भाजप, शिवसेनेचीही मोर्चेबांधणी.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६- २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. कारखान्यावर सत्ता कोणाची येणार याकडे सभासदांसह बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची आशा आता जवळपास संपली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप आणि शिवसेनेच्या विविध गटांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची तयारी सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी राजकीय लढत पाहायला मिळण्याची चित्र दिसत आहेत.याचबरोबर भाजपनेही या निवडणुकीत स्वतंत्रपणे ताकद लावण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे समजत आहे . शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही उमेदवारांची तयारी सुरू असून, शिवसेना ठाकरे गटासह इतर इच्छुक गटांच्याही हालचालींकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी, बैठका आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली असून आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असून २ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र त्यानंतरच अधिक स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची ही पहिली पंचवार्षिक निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे विशेष राजकीय महत्त्वाने पाहिले जात आहे. मात्र कोणत्या गटाला किती उमेदवार मैदानात ठेवायचे, कोणत्या ठिकाणी आघाड्या किंवा स्थानिक समीकरणे तयार होणार आणि कोण माघार घेणार यावर अंतिम लढतीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे.
आता ३० सप्टेंबरनंतरच सोमेश्वरच्या मैदानात कोण – कोण प्रत्यक्ष उतरणार कोणाला उमेदवारीची संधी मिळणार आणि कोणाचा अर्ज माघारी जाणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसह संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
