सात वर्षांच्या मुलीला गळफास लावून पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; नाशिकरोड परिसरात खळबळजनक घटना

क्राईम

प्रतिनिधी

नाशिकरोडमधील जेलरोड परिसरात एका पोलीस शिपायाने आपल्या सात वर्षांच्या चिमुरडीला गळफास लावून ठार मारल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत पोलीस शिपायाचे नाव स्वप्नील शिवाजी गायकवाड (वय ३६) असून, ते उपनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि नातेवाईक असा परिवार आहे.

स्वप्नील गायकवाड हे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. वर्षभरापूर्वी त्यांचा त्यांच्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते मॉडेल कॉलनीतील मंगलप्रभात इमारतीत आई-वडील आणि मुलगी भैरवी (वय ७) हिच्यासह राहत होते. जवळच असलेल्या योगमाला इमारतीत त्यांची स्वतःची एक सदनिका होती.

मंगळवारी (ता. २४ जून) दुपारी ते मुलगी भैरवीला घेऊन योगमाला इमारतीतील फ्लॅटमध्ये गेले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने आणि भ्रमणध्वनीवर संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी योगमाला इमारतीत धाव घेतली. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, घरात कोणताही सुसाईड नोट सापडलेला नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक तणाव, एकटेपणा आणि मानसिक अस्थैर्यामुळे गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

स्वप्नील गायकवाड हे आपल्या कामात प्रामाणिक आणि मितभाषी म्हणून परिचित होते. सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “त्यांच्याकडे तणावाचे कोणतेही ठळक लक्षण दिसले नव्हते,” असे पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बालहत्या आणि आत्महत्येसारखे गंभीर निर्णय घेताना व्यक्ती पूर्णपणे मानसिक असंतुलनाच्या अवस्थेत असतो. अशा प्रसंगी भावनिक आधार आणि वेळेवर समुपदेशन मिळाले असते, तर अशा घटना टाळता आल्या असत्या, असे मनशास्त्रज्ञ डॉ. शिरीष देशमुख यांनी सांगितले.