प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त..
पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी पक्षातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन क्लिनचीट देऊन सन्मानाची पदे देणाऱ्या भारतातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा बारामतीत बाजार उठला असून या राष्ट्रीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून भाजपला तालुक्यात नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
केंद्रातील सर्वोच्च नेत्यांपासून राज्यातील अनेक नेत्यांना बारामतीत मोठा इंटरेस्ट आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांच्याकडे बारामतीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ही बारामतीत भेटी देत भाजपला स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील सर्वच बडे भाजप नेते बारामतीत येऊन पवारांना आव्हान देण्याची भाषा करायचे. स्थानिक नेत्यांना मोठी रसद पुरवण्याचे काम राज्यातील बड्या भाजप नेत्यांनी केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांना भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष तर जिरायत भागातील भाजप नेते दिलीप खैरे यांना पुणे जिल्हा बाजार समितीचे प्रशासक पद देऊन ताकत देण्याचा प्रयत्न झाला परंतु भाजपला बारामतीत चंचुप्रवेश मिळाला नाही.
विधानसभा निवडणुकीतही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त केले होते. त्यामुळे भाजप नेहमीच बारामतीत शिरकाव करण्याची संधी शोधत असते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांनी केंद्रात व राज्यात सोबत काम करतोय असे सांगत मनाचा मोठेपणा दाखवत भाजपसाठी पंचायत समितीच्या दोन हक्काच्या जागा दिल्या. मात्र या दोन्ही जागा घेऊनही भाजपने जिल्हा परिषदेच्या चार जागांवर तर पंचायत समितीच्या सहा जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे करत अजितदादांना धोका दिला. बारामतीत भाजप – राष्ट्रवादी युती नाही असे पत्रही भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी प्रसिद्ध केले.
दुसरीकडे दादांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीने एकाही मतदारसंघात प्रचार केला नाही, जाहीर सभा घेतल्या नाहीत. दादांनी दिलेला शब्द म्हणून भाजपच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा निवडून दिल्या. मात्र इतर सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.
सुपे कऱ्हाटी गटात राष्ट्रवादीचा उमेदवार पल्लवी प्रमोद खेत्रे यांनी १८०९४ मते घेतली तर भाजपच्या उमेदवार वंदना विशाल कोकरे यांना केवळ २६७७ मते मिळाली. वडगाव निंबाळकर – मोरगाव गटात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहिणी संदीप कदम ढोले यांनी २२५७२ मते घेत विक्रम प्रस्थापित केला तर भाजपच्या आरती मधुकर लोखंडे यांना फक्त १०३६ मते मिळाली. पणदरे – मुढाळे गटात राष्ट्रवादीचे उमेदवार मंगेश प्रतापराव जगताप यांना २०८०० मते मिळाली तर भाजपचे उमेदवार सुरेश अरविंद जगताप यांना ३२६४ मतांवर समाधान मानावे लागले. निंबूत – कांबळेश्वर गटात राष्ट्रवादीचे युवा उमेदवार करण खलाटे यांना २२१८१ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार दिग्विजय वसंतराव काकडे यांना अवघी २६५७ मते मिळाली.
या चारही गटातील भाजपच्या उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज फक्त ९६३४ इतकी होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी तब्बल ८३६४७ मते घेत विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समितीच्या उमेदवारांची ही वाताहात झाली असून एकाही उमेदवाराला आपली अमानत रक्कम वाचवता आली नाही. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते या निवडणुकीत कुठेच दिसून आले नाहीत. पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची साधी तसदी ही त्यांनी घेतली नाही. या निकालाने भारतीय जनता पक्षाची बारामतीतील दयनीय स्थिती समोर आली असून केंद्रात व राज्यात हिरो असलेल्या भाजपला बारामतीच्या मतदारांनी झिरो केल्याचे चित्र आहे.

















