प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर:- येथील माळरानावर 54 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या काकडे महाविद्यालयाची वाटचाल अत्यंत दैदिप्यमान सुरू असून या महाविद्यालयाच्या शिरपेचात दरवर्षी नवनवीन तुरे खोचले जातात त्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कौतुक करायला हवे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या 54 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर प्रवरा मेडिकल विद्यापीठाचे कुलपती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.राजेंद्र विखे पाटील, प्रसिद्ध उद्योजक आर.एन बापू शिंदे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख संस्थेचे सचिव सतीश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.गोसावी म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असणारे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा देत आहे हे कौतुकाचे आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायभिमुक शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे आणि त्याच धर्तीवर महाविद्यालयांमध्ये अनेक व्यावसायिक कोर्सेस सुरू करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे कार्य महाविद्यालय करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. राजेंद्र विखे पाटील हे आपल्या भाषणात म्हणाले की, 54 वर्षात महाविद्यालयाने जी प्रगती केली आहे त्यामुळे परिसरच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणात काकडे महाविद्यालयाचे नाव सन्मानाने घेतले जाईल. तसेच ग्रामीण भागातील व तळागाळातील वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. शेवटी त्यांनी महाविद्यालयास आणि उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाने 54 वर्षात केलेली प्रगती, महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रांमध्ये केलेली उन्नती आणि विकास याचा पूर्ण आढावा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपलब्ध नवीन संधी या विषयी माहिती सांगितली. तर अध्यक्षीय मनोगता मध्ये सतीश भैय्या काकडे-देशमुख यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले म्हणून त्यांचे स्वागत व आभार मानले.व तळागाळातील गोरगरिबांना महाविद्यालयात असणाऱ्या सोयी सुविधा व शिक्षण याबद्दल माहिती सांगून शेवटी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे व आभार उपप्राचार्या डॉ.जया कदम यांनी मानले.













