प्रतिनिधी.
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / ०८ / २०२६ ते ०४ / ०८ / २०२६ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
दि. ०१/०८/२०२६ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि संधी’ या विषयावर प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी विचार मांडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. ही एक संधी असून विद्यार्थ्यांना या धोरणानुसार अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. विद्याशाखेचे बंधन जुगारून वेगवेगळ्या विद्याशाखेतील विषय विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी निवडता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने जे बदल उच्च शिक्षणामध्ये येणार आहेत याची सोदाहरण मांडणी त्यांनी आपल्या व्याख्यानातून केली. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ.संजू जाधव यांनी मानले.
दि. ०३ / ०८ / २०२६ रोजी व्याख्यानमालेच्या दुसरा दिवस कै. बाबालाल काकडे देशमुख यांचा स्मृतिदिन. या दिवशी ‘पर्यावरण आणि भारतीय संस्कृती’ या विषयावर डॉ. क्षितिज गर्गे यांनी विचार मांडले. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून आज जर आपण पर्यावरणाकडे लक्ष दिले नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. संतांच्या विचारांचे दाखले देऊन भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला कसे महत्त्व होते हे त्यांनी उपस्थित त्यांना पटवून दिले. त्याचबरोबर आपली जबाबदारी काय आहे? याचीही जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते, त्यांनी कै. बाबांचा आठवणींना उजाळा दिला. बाबांची दानशूर वृत्ती, त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार डॉ. नारायण राजूरवार यांनी मानले.
दि. ०४ / ०८ / २०२६ रोजी व्याख्यानमालेचा तिसरा दिवस ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटीकर यानी व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की, “भाषेमध्ये शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे समृद्धी वाढते. मराठीत बोली आणि प्रमाण भाषेतील शब्दांचे आदान-प्रदान व्हायलाच हवे. प्रत्यक्षात कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, फक्त लेखनाचा अर्थ समोरच्याला समजणे महत्त्वाचे असते, कोणत्याही भाषेतील साहित्याचे भाषांतर करताना त्या त्या भाषिकांची संस्कृती व भूगोल सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, ती संस्कृती आणि भौगोलिक संदर्भ विचारात घेतले तरच ते भाषांतर नेमकेपणाने होत असते. असे प्रतिपादन डॉ. आनंद काटीकर यांनी केले.. सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री सतीश लकडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम , प्रा. राहुल गोलांडे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले केले. तर प्रा . अच्युत शिंदे यांनी आभार मानले.













