मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे. असे मत व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.

Uncategorized

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
“मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्याला आहेत. तिथे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
यानिमित्त विविध प्रकारची नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेचा जागर करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांचे
“मराठी असे आमुची मायबोली” या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण झाले.
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा आहे. साहित्यिकांनी मराठी भाषा, आचार व विचार यांनी समृद्ध केली आहे.
“माझ्या मराठीची बोलू कौतुके,
परी अमृतातेही पैजा जिंके”
अशा शब्दात मराठी भाषेचा महिमा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधून गायला आहे.
संत नामदेव, संत तुकाराम यांनी आपल्या अभंगातून मराठी भाषेची थोरवी परमेश्वरचरणी वाहिली आहे.
संत एकनाथांनी भारुडातून तर शाहिरांनी पोवाड्यातून मराठी भाषा जनमानसात पोहोचवली आहे.
आणि म्हणूनच मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी संस्कृती जतन करणे आपले परम कर्तव्य आहे.
मराठी भाषेत विपुल असे ज्ञानभांडार आहे. यासाठी वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. असे मौलिक विचार प्रा. हनुमंत माने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष- अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष- लक्ष्मण ढोले, दिलीप उदमले, कार्याध्यक्ष- किसन भाऊ हासे, सचिव- ज्ञानेश्वर राक्षे, खजिनदार-गिरीष ढोले, प्रसिद्ध योगाचार्य डॉ. सुधाकर पेटकर, माईंड पावर ट्रेनर विलास दिघे, दर्शन जोशी इ. मराठी साहित्य रसिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक- बाळकृष्ण महाजन, सुत्रसंचलन- अनिल सोमनी व आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले.