• Home
  • माझा जिल्हा
  • हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’
Image

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी

            मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मृती या केवळ इतिहासापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या युगानुयुगे जनमानसाला प्रेरणा देणारा दिव्य स्रोत ठरतात. मानवता, प्रेम, विनम्रता आणि आध्यात्मिक जागृतीचे अद्वितीय प्रतीक असलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंहजी यांच्या पावन स्मृतीस समर्पित ‘समर्पण दिवस’ भावपूर्ण वातावरणात बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न होईल. त्यानंतर उपस्थित श्रद्धाळूंना सतगुरु माताजींचे आशीर्वचन श्रवण करण्याची संधी लाभणार आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे श्रद्धाळू, भक्तगण आणि मानवताप्रेमी या प्रसंगी श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावांजली अर्पण करतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण निरंकारी मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असून, जगभरातील श्रद्धाळूंना त्याचा लाभ घेता येणार आहे.

             बाबा हरदेव सिंहजी हे केवळ संत निरंकारी मिशनचे आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते प्रेम, करुणा, सहजता आणि मानवी संवेदनांचे सजीव प्रतीक होते. त्यांच्या मधुर हास्याने, विनम्र व्यक्तिमत्त्वाने आणि दिव्य वाणीतून असंख्य लोकांना आत्मिक शांततेचा अनुभव दिला. आत्मज्ञानाच्या प्रकाशातून त्यांनी समग्र मानवजातीला असा संदेश दिला की, प्रेम, सेवा, सहअस्तित्व आणि समर्पण यांवर आधारलेले जीवनच खऱ्या अर्थाने सार्थक ठरते.

            त्यांच्या दिव्य नेतृत्वाखाली संत निरंकारी मिशनने समाजसेवेला अध्यात्माशी जोडत रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्यसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युवकांच्या ऊर्जेला आध्यात्मिक दिशा देणारे विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले. समाजात सकारात्मक परिवर्तनाची सशक्त चळवळ निर्माण करण्यात मिशनने मोलाची भूमिका बजावली. ईश्वरभक्ती ही मानव सेवेतून खऱ्या अर्थाने सिद्ध होते, हा बाबाजींचा स्पष्ट दृष्टिकोन होता.

            सुमारे ३६ वर्षे मिशनचे नेतृत्व करताना बाबा हरदेव सिंहजी यांनी संत निरंकारी मिशनला जागतिक स्तरावर नवी ओळख आणि उंची प्राप्त करून दिली. आज हे मिशन ६७ हून अधिक देशांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिक मूल्य आणि मानवकल्याणाचा संदेश प्रभावीपणे पोचवत आहे. त्यांच्या तप, त्याग आणि दूरदृष्टीमुळे मिशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष सन्मान प्राप्त झाला असून संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेचे सल्लागार म्हणूनही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

            पुणे पिंपरी चिंचवड मध्ये सुमारे १७ ठिकाणी समर्पण दिवस सांयकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती संत निरंकारी मंडळाद्वारे देण्यात आली आहे.

            वर्तमानात सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज त्याच दिव्य परंपरेची धुरा समर्थपणे पुढे नेत असून प्रेम, सेवा, संयम आणि आध्यात्मिक चेतनेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या करुणामय सान्निध्यात संत निरंकारी मिशन मानवतेला आत्मबोध, नैतिकता आणि विश्वबंधुत्वाच्या मार्गावर सातत्याने प्रेरित करीत आहे.

            ‘समर्पण दिवस’ हा केवळ श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस नसून, मानवतेला प्रेम, सेवा, विनम्रता आणि समर्पणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या त्या दिव्य जीवनदर्शनाला आत्मसात करण्याचा एक पावन पर्व आहे. हा दिवस प्रत्येकाच्या अंतःकरणात ही जाणीव जागृत करतो की, महान आत्मा आपल्या कर्मातून, विचारांतून आणि आदर्शांतून सदैव जिवंत राहतात तसेच युगानुयुगे मानवतेचा मार्ग प्रकाशमान करीत राहतात.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026