प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल आणि बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांची बदली झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणून आता पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना बढती मिळाली असून त्यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर अंकित गोयल यांच्या जागी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत.
दुसरीकडे बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांचीही बदली झाली असून त्यांना मुंबई पोलिस उपआयुक्तपदी नेमणुक मिळाली आहे. भोईटे यांच्या जागी गृहरक्षक दलाचे अतिरिक्त निरीक्षक संजय जाधव यांना बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून जबाबदारी मिळाली आहे.
राज्यातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारीत झाले आहेत. येत्या काही दिवसात उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणार आहेत.