प्रतिनिधी
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मूर्ती, तसेच चांदीचे मखर चोरून नेले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, रा. खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ) यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात श्री विठ्ठल मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप चोरट्यांनी मध्यरात्री तोडले. मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी गाभाऱ्यातील मूर्ती आणि चांदीची मखर असा ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलिसंनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक फरताडे तपास करत आहेत.