पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस अपघातात २७ प्रवासी जखमी

माझा जिल्हा

प्रतिनिधी

महामार्गावरील टोलनाका परिसरात मार्गिका बदल करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसची पाठीमागून धडक बसल्याने चालक व वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमी चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील आहेत

पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगाराची बस जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका परिसरात मार्गिका बदलत असताना पुढे असलेल्या रसायनाच्या टँकरला या बसची पाठीमागील बाजूस जोरदार धडक बसली. वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती असून या जोरदार धडकेत बसमधील चालक, वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. त्यांना पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य केले.

जखमी प्रवाशांमध्ये गणेश निकम, जयश्री निकम, प्रशांत निकम, लक्ष्मण बाविस्कर, विमल वाणी, दिनेश अहिरे, राजेंद्र पाटील, सुरेखा येवले, हितेश आहेर, (सर्व रा.चाळीसगाव), निकिता विशाल, संतोष कुमार पांडे, वैभव कुमावत, अविनाश राठोड, प्रकाश अमृतकर, मंगला रायते (सर्व रा. नाशिक), गायत्री बैरागी, पूजा पवार, मनीषा पवार, भूमी बैरागी, संध्या बैरागी, कोमल बच्छाव, संगीता बरगडे, गोपाळ खैरनार, योगेश खैरनार, प्रदीप खैरनार, गफ्फार शेख, रजिया शेख (सर्व रा. मालेगाव) आदिंसह चालक, वाचकाचा जखमीत समावेश आहे.