प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गाळप हंगामामध्ये विक्रमी १७६ दिवसांमध्ये ११.९८ रिकव्हरीने १५ लाख २३ हजार ८७६ मे. टन गाळप केलेले आहे. सोमेश्वर कारखान्याने सन २०२३-२४ ची पहिली उचल ३०००/- रू. प्रति मे.टन दिलेली असुन दि. ६/५/२०२४ रोजी १००/- रू. प्रती मे.टन दुसरे बील दिलेले आहे. तरी सोमेश्वर कारखान्याने मागील गळीत हंगामातील खोडकी बील २००/- रू प्रति.मे.टन असे २५ जुन २०२४ पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिशराव काकडे यांनी केली आहे. आज शेतकरी सभासदांना शेतीच्या मशागतीची, लागवडीची कामे, मुलांच्या शिक्षणाची प्रवेश फी इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी कारखान्याने खोडकी बील बील २००/- रू. प्रति मे.टन सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावे.
सोमेश्वर कारखान्याने गतवर्षी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात परिसरातील इतर कारखान्यांपेक्षा जादा गाळप क्षमतेने उसाचे गाळप केलेले असल्याने विक्रमी १५,२३,८७६ मे. टन उसाचे गाळप केलेले आहे. तसेच रिकव्हरी जादा असल्याने साखरेचे, को-जन, उपपदार्थांचे जादा उत्पादन मिळालेले आहे. गत वर्षी कारखान्यास साखरेला सरासरी साखर विकी दर ३७००/- रू. क्विंटल ते ३९००/- रू. प्रति क्विंटल मिळालेला आहे. तसेच डिस्टीलरी व को-जन प्रकल्पांमधुनही जादाचे उत्पन्न मिळालेले आहे. असे असताना सोमेश्वर कारखान्याने काही दिवसांपुर्वीच दुसरे बील १००/- रू. प्रति मे.टन सर्व शेतकऱ्यांना दिलेले आहे. मात्र शेजारील माळेगाव कारखान्याने २००/- रू. कांडेबील सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने तात्काळ २००/- रू. कांडेबील की जे फक्त सभासदांनाच देता येते ते तात्काळ वर्ग करावे.
सन २०२३-२४ या गाळप हंगामामध्ये चेअरमन व संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे सभासदांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे. शेतकी ऑफीसच्या भोंगळ कारभारामुळे परिपत्रकानुसार उस तोडीची अंमलबजावणी न केल्याने सभासदांच्या आडसाली, सुरू खोडवा, पुर्वहंगामी उसाचे गाळप १९ ते २२ महिने उशिराने झाल्याने सभासदांच्या एकरी उसाचे उत्पादन किमान १० मे. टनाने कमी झालेले आहे. महाराष्ट्रात मागील गळीत हंगामामध्ये दुष्काळ पडला असल्याने दोन दोन महिने उसाला पाणी नसल्याने उस जळुन गेला. तसेच बागायत क्षेत्रामध्येही बऱ्याच भागांमध्ये विहीरींना पाणी कमी पडल्याने एक ते दिड महीना झाले असल्याने उसाला पाणी देता आले नाही. त्यामुळे बऱ्याच उसाचे वाढे ही जळाल्याने उस तोडणी कामगारांनी एकरी ५ ते १० हजार रूपये, काही ठिकाणी टनाला ३० ते ५० रू. घेतले, तसेच बहुतांश उस वाहतुकदार सभासदांकडुन जेवणासाठी रोज ३०० रू व काही ठिकाणी तर एक हजार रूपये घेतले आहेत. तसेच कुठलीही कारणे सांगुन वाहतुकदार व उस तोडणी कामगार यांनी सभासदांकडुन पैसे घेतले आहेत. उस तोडणी कामगार व काही वाहतुकदार यांनी संगणमताने उसाच्या तोडी उरकण्यासाठी उस जळीत करून गाळपास आणल्याने सभासदांचे प्रती मे.टन ५०/- रू. कारखान्याने कपात करून घेतलेले आहेत, तसेच काही शेतकऱ्यांचा अडसाली उसास वेळेत तोड न दिल्याने त्या सभासदांनी उस बाहेरील कारखान्याना गाळपास दिल्याने त्यांना टनाला ३००/- ते ४००/- रू. प्रती मे.टन तोटा सहन करावा लागला याची जबाबदारी कोणाची आहे? त्याचप्रमाणे उसाची वेळेत तोड न झाल्याने सभासदांचे दुबार पीक (गहु, हरबारा व इतर) घेता न आल्याने सभासदांचे तिहेरी नुकसान झालेले आहे. की कारखाना सुरू झालेपासुन असा फटका सभासदांना कधीही बसला नाही. याबाबत शेतकरी कृती समितीने वारंवार आवाज उठवुनही कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने याकडे गांर्भियांने लक्ष दिले नाही. त्यामुळे कृती समितीने या संबंधी कारखान्याच्या चुकीच्या चाललेल्या कारभाराबाबत सर्व गोष्टी मा.ना. अजितदादा पवार यांच्या कानावर घातल्या असता दादांनी चेअरमन व कार्यकारी संचालक यांना कारखान्याने चुकीच्या पध्दतीने कपात केलेले सभासदांचे पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिल्यानेच सभासदांचे कपात केलेले ८० ते ८५ लाख रूपये त्यांना मिळाले. परंतु लोकसभेची निवडणुक असल्या कारणाने, आचारसंहिता असल्याने कृती समितीने हा मुद्दा उपस्थित केला नाही परंतु फक्त शेतकरी कृती समितीच्याच पाठपुराव्यामुळे सदर रक्कम सभासदांना मिळालेली आहे.
सोमेश्वर कारखान्याने वेळो वेळी कोट्यावधी रूपयांची कर्जे काढली, डिफर्ड खर्च नावे टाकला व संचालक मंडळाने केलेल्या गैरकामकाजातुन आलेल्या तोट्याची परतफेड सभासदांनी शेजारील इतर कारखान्यांपेक्षा ३ ते ४ वर्ष कमी दर घेवुन केली. मग मागील गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कमी उस असल्यामुळे कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप केले. उस उत्पादन कमी असल्याने व साखरेला जादाचा दर मिळाल्याने सभासदांना अधिकचे पैसे मिळतील अशी अपेक्षा असताना चेअरमन यांनी सभासद व गेटकेन धारकांना समान दर देवुन सभासदांच्यावर अन्याय केलेला आहे. म्हणजे हा कारखाना सभासदांचा आहे की गेटकेन धारकांचा आहे? चेअरमन विस्तारीकरणाच्या वेळी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये २० लाख मे.टन उस गाळपासाठी उपलब्ध होईल असे म्हणाला होता मग हा उस कोठे गेला? तरी सभासद व गेटकेन धारकांना चेअरमन व संचालक मंडळाने मनमानी करभार करून व सभासदांचा तोटा करून समान दर दिला तर शेतकरी कृती समिती तीव्र आंदोलन करणार आहे व पुढील होणाऱ्या परिणामांची जबाबदारी चेअरमन व संचालक मंळडाची राहिल याची नोंद घ्यावी.
तरी सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२३-२४ या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाचे कांडे बील २००/- रू. प्रती मे.टन की जे फक्त सभासदांनाच देता येते ते २५ जुन २०२४ पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. तसेच जानेवारी २०२४ नंतर गाळपास आलेल्या उसाचे टप्पे ठरवुन उशिरा गाळप झालेल्या उसास प्रति मे.टन ५०/- रू. वाढीव अनुदानही तात्काळ सभासांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करावे. अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिशराव काकडे यांनी केली आहे.
सोमेश्वर कारखान्याने जानेवारी २०२४ नंतर गाळपास आलेल्या उसाचे टप्पे ठरवुन उशिरा गाळप झालेल्या उसास अनुदान दिलेले होते. परंतु कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने दिलेले अनुदान हे तुटपुंजे असुन कारखान्याच्या चुकीच्या उस तोडणी नियोजनामुळे व शेतकी खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे सभासदांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तरी शेतकरी कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की कारखान्याने जानेवारी २०२४ नंतर ज्या ज्या सभासदांच्या उसाचे गाळप झालेले आहे. त्यांच्या उसास वाढीव ५०/- रू. प्रति मे.टन अनुदान देवुन ती ही रक्कम तात्काळ त्या त्या सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी.