प्रतिनिधी
युवती अल्पवयीन असताना तिचा बळजबरीने विवाह केल्याप्रकरणी पती, सासू, आई, वडिलांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा बळजबरीने एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आल होता. युवतीने विवाहास विरोध केला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती पती, सासू, आई आणि वडिलांना होती. विवाहानंतर मुलगी गर्भवती झाली. वैद्यकीय तपासणीत ही बाब उघड झाली. त्यानंतर युवतीने नुकतीच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बेदगुडे तपास करत आहेत. अल्पवयीन युवतींना धमकावून, तसेच बळजबरी करुन त्यांचे विवाह करण्यात येत असल्याचे प्रकार घडतात. अशा प्रकरणात तक्रारदार युवतींच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची असते.
हलाखीच्या परिस्थितीमुळे युवतींचे बळजबरीने विवाह लावून दिले जातात. बालविवाह कायद्यान्वये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतात, तसेच युवती गर्भवती झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ याबाबतची माहिती पोलिसांना देतात.
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणासह, त्याची आई आणि भावाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख झाली. ओळखीतून त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिने विवाहाबाबत िविचारणा केली. तेव्हा छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. आरोपी तरुणाची आई आणि भावाने तिला शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनात खांडेकर तपास करत आहेत.