बारामती, (प्रतिनिधी): वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोटा गुन्हा दाखल करून अटक होईल अशी भीती दाखवत एका व्यक्तीकडून १२ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय हिंदुराव साळुंखे (वय ३६, रा. वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद नामदास (रा. विकासनगर, वाणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(६)(७), ३५१(२)(३) व ३१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेदरम्यान तसेच २० जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हरणाई चौक, वाणेवाडी येथील विजय किराणा स्टोअर्समध्ये ही घटना घडली. आरोपीने स्वतःचे पोलीसांशी संबंध असल्याचे भासवून फिर्यादीवर करंजेपूल पोलीस दूरक्षेत्रात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक होईल, अशी भीती दाखवली. या भीतीपोटी फिर्यादीकडून १२ हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतल्याचा तसेच त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करून धमकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.












