प्रतिनिधी
पुणे आता बिहारच्या पलीकडे गेलं असं म्हणणे हे चुकीचं ठरणार नाही. मारामारी, खून आणि कोयत्याने हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच कात्रजमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
जुन्या वादातून या मुलाची अल्पवयीन मुलांनीच हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीवर बांधून धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजमध्ये १७ वर्षीय मुलाची कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली होती. गणेश रविंद्र माळवे असं या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गणेश माळवे हा मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून ७ जणांनी सोमवारी रात्री त्याच्यावर हल्ला केला. या टोळक्याने कोयत्याने गणेशवर सपासप वार केले. एवढंच नाहीतर डोक्यामध्ये दगड घालून ठार मारलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिासांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून गणेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जुन्या वादातून 7 जणांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. हत्या करणारे सर्व आरोपी अल्पवयीन आहे, असे सूत्राकडून माहिती मिळत आहे.
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांची भरपावसात गाडीला बांधून धिंड काढण्यात आली. ज्या परिसरामध्ये गणेशची हत्या करण्यात आली होती, त्याच परिसरामध्ये या अल्पवयीन पोरांची गाडीवर बांधून धिंड काढली. यावळी आरोपींना दाखवण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर मागणी केली. नातेवाईकांनी यावेळी गोंधळ घालत आरोपींविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणी सात जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.














