• Home
  • माझा जिल्हा
  • प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
Image

प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

प्रतिनिधी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त संवाद कार्यक्रमात वाचन संस्कृती विकसीत करण्याची ग्वाही

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि साधारण २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दीष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे.

फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देणार

पुण्यात दोन ठिकाणी फिरते ग्रंथालय चालविण्यात येत आहे. अशा फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठी भाषेतून सांगणारे यंत्रदेखील विकसीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तके वाढली पाहिजेत.

धनंजय कीर यांचे चरित्रलेखन आवडीचे

धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे संशोधनपर असल्याने त्यातून चांगली माहिती मिळते. त्यांनी लिहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र आवडीचे आहे. तसेच देशभर सामाजिक समतेसाठी झालेल्या प्रवासात त्यांनीच लिहिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा खूप उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रत्येक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न असतो, असे श्री.पाटील यांनी आपल्या वाचनाच्या आवडीविषयी बोलताना सांगितले.

आवड असली तर वेळ काढता येतो

समाजमाध्यमांमुळे वाचन कमी होत आहे काय, असा प्रश्न  विचारण्यात आल्यावर मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन हा आवडीचा आणि वेळेचाही विषय आहे. वाचनाची आवड असल्यास समाजमाध्यमांचा परिणाम होत नाही. आवड असली तर वाचनासाठी वेळ काढता येतो. अलिकडच्या काळात लोकप्रतिनिधींना वाचनासाठी वेळ मिळणे कठीण असते. अशावेळी एखाद्या वाचन करणाऱ्या व्यक्तीकडून विषय समजावून घेतल्यास त्याचा उपयोग होतो. भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात.

अटल बिहारी वाजपेयी यांचे वाचन मोठ्या प्रमाणात होते. ते वाचनासाठी वेळ कसा काढतात याचेही आश्चर्य वाटायचे. अलिकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाचन खूप आहे. अलिकडच्या काळातील संदर्भही त्यांच्या भाषणात येतात असे सांगताना ज्ञानेश्वरीपासून आपल्या वाचनाची सुरूवात झाली, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026