मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

mnewsmarathi प्रतिनिधी
July 6, 2026 1 मिनिटांचे वाचन 5003 वेळा पाहिले

 

प्रतिनिधी

बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वेकडून सुरू असलेले तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम बंद पाडले. “भराव नको, पूल बांधा” अशी एकमुखी मागणी करत ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.

स्थळ पाहणीसाठी रेल्वेचे प्रकल्प उपअभियंता दीपक कुमार, वन विभाग, प्रांत कार्यालय तसेच छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सरपंच, जैवविविधता व्यवस्थापन समिती, वन व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून तलावाच्या संरक्षणाची भूमिका मांडली.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सोनकसवाडीचा पाझर तलाव हा केवळ पाण्याचा साठा नसून परिसरातील भूजल पुनर्भरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. या तलावामुळे सुमारे आठ किलोमीटर परिसरातील विहिरींना पाणी उपलब्ध होते आणि शेतीसाठीही त्याचा मोठा आधार आहे. तलावावर मातीचा भराव टाकल्यास भूजल पुनर्भरणावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान होईल, असा दावा ग्रामस्थांनी केला.

प्राणीमित्र पुष्कराज जगताप, सरपंच राणी कोकरे, चित्रा घुले, दादासाहेब शेलार, तानाजी तावरे-मोहिते आदींनी रेल्वेने भरावाऐवजी पूल उभारण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी केली. तसेच प्रस्तावित रेल्वेमार्गावर वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी आवश्यक त्या ठिकाणी मोऱ्या  उभाराव्यात, जेणेकरून सोनकसवाडी, कऱ्हावागज, ढाकाळे आणि मुढाळे परिसरातील पर्यावरणीय कॉरिडॉर अबाधित राहील, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर सर्व्हे ऑफ इंडियाचा जुना नकाशा सादर केला. तसेच २०१५ ते २०१९ या कालावधीत या परिसरात वन्यजीवांवर करण्यात आलेल्या रेडिओ-कॉलरिंग अभ्यासाचे संदर्भ मांडले. वन विभागाने पर्यावरणीय कॉरिडॉरला होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत माहिती सादर केली, तर छोटे पाटबंधारे विभागाने तलावात भराव टाकल्यास होणाऱ्या परिणामांचे पुरावे मांडत पूल उभारण्याची शिफारस केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, रेल्वेचे प्रकल्प उपअभियंता दीपक कुमार यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत, सादर करण्यात आलेल्या सर्व बाबींचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

स्थळ पाहणीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन आणि ग्रामस्थांमधील चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पाझर तलावाचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा